सोलापूर -छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) येथे व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. ही संख्या एकूण बेडच्या संख्येच्या पंचवीस टक्के असायला हवी. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज सोलापूर येथे दिल्या. कोरोना विषाणू संसर्गाबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांनी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर उपस्थित होते.
'तिसरी लाट रोखण्यासाठी तयारी करा'
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोकण्यासाठी प्रयत्न करा. तसेच, लहान मुलांसाठी स्वतंत्र नियोजन करा, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले. कोरोनाची दुसरी लाट आता ओसरु लागली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोना संसर्ग कमी होत आहे. मात्र, आपण तयारीत रहायला हवे. तिसरी लाट येणार हे ग्रहीत धरुन तयारी करायला हवी. त्यासाठी व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. त्याचबरोबर बालकांच्यासाठी तयारीचे नियोजन करा. ग्रामीण भागातील शासकीय दवाखान्यात व्हेंटिलेटर, बायपैप मशीन, ऑक्सिजन बेड याचीही तयारी करा असे देशमुख म्हणाले.