पंढरपूर -पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये कोरोना साखळी तोडण्यासाठी तालुका प्रशासनाकडून 14 दिवसाची संचारबंदी लागू केली आहे. पंढरपूर शहरात डेंग्यू व चिकुनगुनीया सदृश्य संसर्ग रोगाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. शहरात दोन महिन्यांत 2767 घरांमध्ये डेंग्यू व चिकुनगुनीया सदृश्य अशा अळ्या आढळून आल्याची माहिती पंढरपूर नगरपरिषदेचे जीवशास्त्र अधिकारी किरण मंजुळे यांनी दिली आहे.
पंढरपूर शहरात डेंग्यू व चिकुनगुनिया सदृश्य अळ्याचे थैमान
गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने पंढरपूर शहर व तालुक्यात मोठा धुमाकूळ घातला आहे. त्यातच पंढरपूर तालुक्यातील 21 गावांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र आता पंढरपूर शहर डेंग्यू व चिकुनगुनिया सदृश्य आजाराने डोके वर काढले आहे. पंढरपूर नगरपरिषदेकडून गेल्या दोन महिन्यापासून 23 हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 2767 घरांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये चिकुनगुनिया डेंग्यू सदृश्य अळ्या आढळून आले आहेत. त्यामुळे डेंग्यू व चिकुनगुनिया सदृश्य आजार पंढरपूर शहरात वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.