सोलापूर : सोलापूर हैदराबाद महामार्गावर असलेल्या मुळेगाव रोडवरील सोनांकूर एक्सोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसह आसरा चौक, कुमठा नाका, हैदराबाद रोडवरील भंगार विक्रेते, बांधकाम साहित्य, स्टील विक्रेत्यांवर आयकर विभागाने सोमवार ते गुरुवार असे चार दिवस छापे टाकले. या छाप्यांमध्ये सुमारे ५० कोटी रुपयांचे बोगस व्यवहार आढळून आल्याची माहिती आयकर विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. तब्बल चार दिवस एकाच वेळी अचानकपणे धाडी पडल्या होत्या. व्यापाऱ्यांना व व्यवसायिकांना काही समजण्या अगोदर आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून कारवाई केली आहे.
शहरातील भंगार व्यवसायिकांवर कारवाई :आयकर विभागाने दोन महिन्यांपूर्वी शहरातील विविध रुग्णालयांवर छापेमारी करत शंभर कोटींवर घबाड जप्त केला होता. या कारवाईत शहरातील रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई झाली होती. शहरातील रुग्णालयावर झालेल्या कारवाईत 100 कोटींचा गैरप्रकार समोर आला होता. सोमवार ते गुरुवार असे चार दिवस आसरा चौक परिसर, हैदराबाद रोड, कुमठा नाका परिसरात बीफ, भंगार विक्री, बांधकामाचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर छापेमारी झाली. या व्यावसायिकांनी भंगार, साहित्य विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने खरेदी करत, टॅक्स चोरला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.