सोलापूर -येथील शासकीय रुग्णालयात 120 खाटांचे कोव्हिड वॉर्ड अवघ्या दहा दिवसांत तयार करण्यात आले. रविवारी (दि. 26 जुलै) या कोविड वार्डाचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे, आमदार यशवंत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बी ब्लॉक येथे 120 खाटांचे नवे कोव्हिड वॉर्ड तयार करण्यात आले आहे. या वॉर्डामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. टाळेबंदीच्या दहा दिवसांत हे वॉर्ड तयार झाले आहे. रात्रंदिवस काम करुन ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, खाट, गाद्या, बेडशीट आदींची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शानाखाली हे कोव्हिड वॉर्ड तयार करण्यात आले आहे.