सोलापूर - पुणे पदवीधरच्या 62 व शिक्षक मतदार संघातील 35 उमेदवारांसाठी सोलापूर जिल्ह्यात आज मंगळवारी मतदान झाले. पदवीधरांसाठी 62.7 टक्के तर शिक्षकांसाठी 85.09 टक्के मतदान झाले. दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, उद्या 3 डिसेंबर रोजी पुण्यात मतमोजणी होणार आहे.
मतदारांच्या रांगा-
पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यातील 197 केंद्रावर उस्फूर्तपणे मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. शहर व जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाली होती.
कोरोना विषाणूचा फैलाव रोखत मतदान-
प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या उपायोजना करीत प्रत्येक मतदाराचे थर्मल गन द्वारे तपासणी करण्यात आली. तसेच सॅनिटायझर देऊन मतदान करण्यासाठी मतदारास प्रवेश देण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगला देखील अधिक महत्व देण्यात आले.