सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघात जनसंवाद सुरू केला आहे. दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यात अवैध धंद्याने जोर पकडला आहे. यापूर्वीही भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोलकवठे गावातील अवैध दारूच्या भट्ट्या बंद करण्याची मागणी केली होती. आमदार सुभाष देशमुख यांनी मंद्रूप पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना या संदर्भात बोलावून घेतले होते. त्यानंतर आता दारूबंदीच्या मागणीसाठी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात अवैध हातभट्टी दारू व्यवसायामुळे संतप्त महिलांनी भाजप आमदार सुभाष देशमुख यांना रोखले. माझ्या मतदारसंघातील हातभट्ट्या लवकरात लवकर बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी महिलांना सांगितले.
सुभाष देशमुखांचा ताफा अडवून तीव्र संताप :आ. सुभाष देशमुख 22 जून रोजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसुर, विंचुर या दोन गावांची भेट घेत परत जात होते. विंचूर गावातील महिलांनी सुभाष देशमुखांचे वाहन अडवून दारू बंदीची मागणी केली. या गावात दारूची खुलेआम विक्री होत असून येथील पुरुष आणि तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे येथील दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी महिलांनी संताप व्यक्त केला. आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांना फोन लावून यासंदर्भात कल्पना दिली. लवकरच येथील सर्व अवैध धंदे बंद करा अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.