सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील 52 गावच्या सरपंच, ( 52 sarpanches joined BRS party ) उपसरपंचानी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (BRS) प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao ) यांनी स्वागत केले. सोलापुरातील समन्वयक, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, सचिन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद येथील तेलंगाणा भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान हा प्रवेश सोहळा पार पडला.
राज्यातील मोठ्या पक्षांना धक्का : त्यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ सोलापूरच्या विविध मतदारसंघात घुमत असल्याने सोलापूर शहर, जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नवी समीकरणे निर्माण होत आहेत.
माजी सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघात गुलाबी वादळ : दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपचे माजी सहकारमंत्री तथा विद्यामान आमदार सुभाष देशमुख ( MLA Subhash Deshmukh ) यांना या पक्ष प्रवेशामुळे धक्का बसणार आहे. देशमुख यांनी 2014, 2019 मध्ये दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे दिलीप माने यांचा पराभव करत 97 हजार 333 मते मिळवली होती. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांच्या विरोधात 87 हजार 223 मते मिळवली होती. मात्र आता बीआरएसचे गुलाबी वादळ त्यांच्या मतदारसंघात घोंघावत असल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.