सोलापूर - शोषण व्यवस्थेचा बळी पडलेला सर्वांत मोठा घटक म्हणून नेहमी शेतकरी वर्गाची गणना होते. तसे अहवालही आपण वर्षानुवर्षे वाचले-पाहिले आहेत. पण याच व्यस्थेने शेतकऱ्यांना संकटाशी दोन हात करण्याची ताकदही दिली आहे. ती आताच्या कोरोनाच्या परिस्थितीतही पाहायला मिळते.
वाट दिसू देगा देवा.. शेतकरी लढतोय, पर्याय काढतोय पण पराभूत होत नाही..! - सोलापुरातील प्रयोगशील शेती
स्पर्धेत न धावता कुरुलच्या भाग्यश्री आणि श्रीकांत जाधव या प्रयोगशील शेतकरी दाम्पत्याने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळत आपल्या बागेतील द्राक्षांपासून बेदाणा निर्मितीचा निर्णय घेतला.

सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा ऐन बहरात असताना कोरोनाचा कहर सुरू झाला. रस्त्यावरची वाहतूक थांबली, बाजार समित्या बंद पडल्या आणि कोट्यवधी रुपये खर्चून पिकवलेल्या बागा सडून जाऊ लागल्या. मग मिळेल त्या भावाने द्राक्ष विक्री करून उत्पादन खर्च काढण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. पण, याच स्पर्धेत न धावता कुरुलच्या भाग्यश्री आणि श्रीकांत जाधव या प्रयोगशील शेतकरी दाम्पत्याने सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळत आपल्या बागेतील द्राक्षांपासून बेदाणा निर्मितीचा निर्णय घेतला. बेदाणा निर्मिती ही पहिल्याच प्रयत्नात होईल का? तर त्याचे उत्तर नाही असे असू शकते. पण, दरवर्षी द्राक्षांचीच विक्री करणाऱ्या छोट्या शेतकऱ्याने संकटात निवडलेला पर्याय महत्त्वाचा म्हणावा लागेल. फक्त आता त्यांना अपेक्षा आहे ती बेदाण्याला मिळणाऱ्या भावाची.
कोरोनामुळे शहरे-गावे ओस पडली आहेत. एका अर्थाने समाज व्यवस्थाच बंद पडली आहे. या परिस्थितीत औद्योगिक उत्पादन थांबले, तर ते पुन्हा सुरू करता येते. पण, लॉकडाऊनमुळे शेतीमाल थांबला तर त्याची मातीच होते. तरीपण शेतकरी थांबलेला नाही. त्याने पर्याय आणि प्रयत्न सुरू ठेवले आहेतच, पण अपेक्षा आहे कोरोनाचे संकट संपल्यावर तरी या बळीराजाच्या प्रयत्नांना यश यावे.