सोलापूर -पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत 1 लाख 23 हजार 450 रुपये किंमतीची 5 हजार 300 लिटर दारू जप्त करण्यात आली. पंढरपूर पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे.
सोनके भागात संशयित आरोपी दिलीप कृष्णा गायकवाड आणि मोहन अनिल दिघे हे अवैधरित्या हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
पंढरपुरात हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा ; 5 हजार लिटर दारू जप्त - illegal country liquor distillery
पंढरपूर तालुक्यातील सोनके येथे हातभट्टीच्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईत 1 लाख 23 हजार 450 रुपये किंमतीची 5 हजार 300 लिटर दारू जप्त करण्यात आली.
बुधवारी (ता. 11 नोव्हेंबर) रात्री सोनके तलावाजवळ दिलीप गायकवाड यांच्या उसाच्या शेतात विजेच्या खांबावरून चोरीची वीज घेऊन हातभट्टी तयार करण्यात येत होती. या ठिकाणी गूळ मिश्रित रसायन व अन्य घातक रसायने मिसळण्यात येत होती. पोलिसांची चाहूल लागताच दिलीप गायकवाड आणि मोहन दिघे दोघेही पळून गेले.
कारवाई दरम्यान पोलिसांनी हातभट्टी उद्ध्वस्त करून सर्व साहित्य जप्त केले आहे. तसेच दोघांविरोधात भादंवि कलम 328 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक मैनुद्दीन खान, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आनंता शिंदे, पोलीस नाईक मोहसीन सय्यद, रसीद मुलाणी, अंकुश नलवडे यांचा सहभाग होता.