सोलापूर: सिताराम येचुरी हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदीय कामकाजावर नाराजी व्यक्त केली. 2022 मध्ये संसदेचे फक्त 56 दिवस कामकाज चालले. त्यातील 52 दिवस काहीही काम केले नाही. भारताचे संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी मोदी सरकारला हटविणे गरजेचे आहे, तरच देश वाचणार आहे आणि यासाठी देशभरातील सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माकपचे महासचिव व माजी खासदार सिताराम येचुरी यांनी केले.
तो तर राज्याभिषेक सोहळात:५० लाख कोटींच्या खर्चाचे अधिकार केंद्र सरकार स्वतःच्या हातात घेऊन कायदा पास करत आहे. ही देशासाठी अत्यंत निंदाजनक बाब आहे. संसदेचे काम मजबूत केले पाहिजे. संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन म्हणजे एक राज्याभिषेक सोहळाच होता. कोणालाही विश्वासात न घेता संसदेची नवीन इमारत बांधण्यात आली. मोदी सरकारने यासाठी स्वतःच निर्णय घेतलेले आहेत. एका राजा प्रमाणे संसद इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. राजा महाराजांची ही प्रथा बंद करून जनतेचे सरकार किंवा संविधानिक सरकार स्थापन करण्यात यावे, असे येचुरी म्हणाले.