पंढरपूर (सोलापूर)-माथाडी कामगारांची चळवळ टिकवण्यासाठी मी भाजपमध्ये आलो. त्याबद्दल मला कुणी पक्षनिष्ठा शिकवण्याची गरज नाही, असा सणसणीत टोला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदे यांना लगावला आहे. कुर्डुवाडी येथे मराठा आरक्षण सद्यस्थिती, मार्गदर्शन गुणवंत पुरस्कार सोहळ्यासाठी ते आले होते. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात मराठ्यांना न्याय -
शशिकांत शिंदे यांनी आपली जात सांगावी. तसेच मी माथाडी कामगार आहे. माथाडी कामगार चळवळ धोक्यामध्ये आल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत गेलो. जर त्यावेळी माथाडी कामगारांवर अन्याय झाला असता व त्यांचे वाटोळे झाले असते, तर शशिकांत शिंदे राष्ट्रवादीत राहिले असते. मात्र, माझी पक्षनिष्ठा माथाडी कामगार आहे आणि ती चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मी भाजपमध्ये गेलो. 1980 पासून कोणत्याही सरकारने मराठा समाजाला न्याय दिला नाही. ते काम फडणवीस यांच्या काळात झाले आहे. शशिकांत शिंदे यांच्या पक्षाने मराठ्यांसाठी काय केले, ते एकदा सांगावे, असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला.