पंढरपूर (सोलापूर) -पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन धारधार शस्राने वार करत पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. ही घटना पंढरपुरातील कुंभार गल्लीत आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजता घडली. हत्येनंतर पती स्वत: हून पंढरपूर पोलीस स्टेशनमधे हजर झाला आहे. निकिता आकाश पवार असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.
पंढरपुरात चारित्र्याच्या संशयावरुन पतीने केली पत्नीची हत्या - पंढरपूर खून प्रकरण
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन धारधार शास्राने वार करत पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. ही घटना पंढरपुरातील कुंभार गल्लीत आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजता घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश पवार (वय 23, रा. कुंभार गल्ली) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. आकाश आणि निकिता हे पंढरपूर येथील राहणारे आहेत. आकाश आणि निकिताचा विवाह चार महिन्यापूर्वी झाला होता. त्यानंतर सासू सुरेखा पवार आणि सासरा सुदेश पवार हे निकिताला माहेरुन सोने आणि भांडे घेऊन ये म्हणून मारहाण आणि शिविगाळ करत असत. तर पती आकाश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे घरी सारखे भांडण होत असत. मात्र, निकिताचे माहेर जवळ असल्यामुळे ती घरी सोने आणि भांडयांची मागणी करत होती.
आज पहाटे आकाशने निकितावर तीक्ष्ण शास्राने वार करत तिची हत्या केली. यानंतर आरोपी आकाश हा घरातून तो थेट पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. निकिताचा मामा पीतांबर बंदपट्टे यांनी पती आकाश पवार, सासू सुरेखा पवार, सासरा सुदेश पवार यांच्याविरुद्ध पंढरपूर पोलीस स्टेशनमधे तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी पोलीस विभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी भेट दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर हे करत आहेत.