पंढरपूर - पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गावच्या कॅनॉलमध्ये तीन महिन्यापूर्वी पायाला व कमरेला काळी दोरी बांधलेल्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पोलिसांनी तपास करत असताना तो मृतदेह पुणे जिल्ह्यातील पिंपळे गुरव या गावातील राहणारे सुरेश गणपत कांबळे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी संशयित लोकांची माहिती काढली. याप्रकरणी हॉटेल मालकासह दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
तीन महिन्यानंतर खुनाचा उलगडा
हॉटेल चालकाने आपल्याच दोन साथीदारांच्या मदतीने दारू पिऊन शिवीगाळ करतो म्हणून हॉटेलमधील कूकचा (सुरेश गणपत कांबळे) गळा आवळून खून केला होता. त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. दोन्ही पाय व कमरेला दोरीने दगड बांधून माळशिर तालुक्यातील कॅनॉलमध्ये मृतदेह फेकून दिला होता. तो मृतदेह पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी येथील कॅनॉलमध्ये आढळला होता. याप्रकरणी भाऊ हुलगे, भानुदास हुलगे, हनुमंत निवृत्ती गोरड (सर्व रा. गोरडवाडी ता. माळशिरस जि. सोलापूर) यांना तीन महिन्यानंतर अटक करण्यात आली आहे. पंढरपूर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे.