सोलापूर- कतारहून मुंबई विमानतळावर आल्यावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आलेली एक व्यक्ती आज चक्क उद्यान एक्स्प्रेसमध्ये आढळल्याने सहप्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला. त्यानंतर त्या प्रवाशाला मध्येच उतरवून आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात देण्यात आले.
उद्यान एक्सप्रेस'मध्ये आढळली 'होम क्वारंटाईन' व्यक्ती उद्यान एक्सप्रेसच्या बोगी क्र. एस 5 मधून हा प्रवासी मुंबईहून कलबुर्गीकडे (गुलबर्गा) निघाला होता. रेल्वे पुण्याजवळ आली असता त्याच्या हातावरील शिक्का सहप्रवाशांनी पहिला आणि एकच घबराट पसरली. बोगीतील इतर प्रवाशांनी तत्काळ रेल्वे प्रशासनाला या होम क्वारंटाईन प्रवाशाची कल्पना दिली. त्यावेळी दौंड रेल्वे स्थानकावर त्या प्रवाशाला उतरवून आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आले.
तोपर्यंत उद्यान एक्स्प्रेसच्या बोगी क्र. एस 5 मधील प्रवाशामध्ये घबराट पसरली. रेल्वे सोलापूर रेल्वे स्थानकात आल्यावर येथील अश्विनी सहकारी रुग्णालय आणि रेल्वे डॉक्टर्सच्या चमूने या बोगीतील सर्व प्रवाशांची तपासणी केली. त्यावेळी सुमारे 14 प्रवाशांचा ताप असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले. त्या सर्व प्रवाशांची तपासणी करून आरोग्य यंत्रणांना अहवाल सादर केले जाणार आहेत. त्यांना 14 दिवस घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच यावेळी उद्यान एक्स्प्रेस मधील 50 प्रवाशांना दुसऱ्या बोगीत हलवून संसर्ग झालेली बोगी सील करण्यात आली आहे.
हेही वाचा -सोलापूर शहरासह जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठा बंद, मात्र रस्त्यावर तुरळक गर्दी