सोलापूर- रब्बी पिकांच्या पेरणीसाठी प्रतिक्षा करत असलेल्या बळीराजाला हस्त नक्षत्राच्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील रब्बी पेरणीला वेग येणार आहे. पुरेशा प्रमाणात ओलावा नसल्यामुळे शेतकर्यांना पेरणी करणे कठीण झाले होते. पण, शनिवारी झालेल्या पावसामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शनिवारी सकाळपासूनच उखाडा जाणवत होता. दुपारी साडेतीनच्या दरम्यान पावसाला सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झाला आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यावर पाणी वाहत होते. या पावसामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती.
यंदा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीनचे पीक घेतले आहेत. 15 ते 20 दिवसांच्या विश्रांतीनंतर शेतकर्यांनी मूग, उडीद, सोयाबीनचे पीक काढले आहे. ज्या शेतकर्यांचे पीक चांगले आले आहे त्या शेतकर्यांना चार पैसे देखील या पिकाच्या माध्यमातून हाती लागले आहेत.