सोलापूर- कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 96 टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ : सोलापुरातील ग्रामीण भागात 35 लाख नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण - Solapur corona update
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीमें अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 96 टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 1621 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम 15 सप्टेंबर 2020 पासुन सुरू केली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 1621 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्वयंसेवकांचाही समावेश आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान 50 पेक्षा अधिक घरांना भेटी देऊन कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करत आहेत. घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत असुन ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. तसेच आवश्यकता भासल्यास या व्यक्तींची कोविड-19 ची चाचणी करून पुढील उपचार केले जात आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत जिल्ह्यात 7 लाख 53 हजार 560 कुटुंबाना भेट दिली असून जवळपास 35 लाख 11 हजार 899 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. या तपासणीत आरोग्य पथकांना 1 लाख 68 हजार 580 जुन्या विकारांचे रुग्ण आढळुन आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, ह्दयविकार, कर्करोग, मधुमेह, अस्थमा, किडनी विकार, क्षयरोग, लठ्ठपणासह इतर आजारांचाही समावेश आहे. सारी व सर्दी, खोकला, तापाचे रुग्णही आढळून आले आहेत. तर, कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करुनन त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1886 कोरोनाबाधित रुग्ण शोधण्यात आरोग्य पथकांना यश आले आहे.