सोलापूर : तेलंगाणा राज्याचे अर्थमंत्री हरिश राव हे मंगळवारी मार्कंडेय मंदिराच्या दर्शनासाठी सोलापुरात आले होते. हरीश राव मंदिरात येऊन पूजा करून मार्कंडेय रथोत्सवात सहभागी झाले होते. हरीश राव (Telangana minister) यांनी माध्यमांना माहिती देताना, राजकीय बाबींवर प्रकाश टाकला. तसंच काँग्रेस, राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. बीआरएस पक्षाला भाजपाची बी टीम म्हणणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील नेते स्वतः भाजपाबरोबर जाऊन बसले आहेत. आम्ही देखील हैराण आहोत. तर महाराष्ट्रातील राजकारण पाहून अर्थमंत्री हरीश राव यांनी टीका केली. (Harish Rao On Solapur Tour)
बीआरएसची एकच आघाडी आहे : इंडिया आघाडीमध्ये बीआरएस पक्षाने सामिल न होण्याचा निर्णय घेतला आहे. यावर हरीश राव यांनी मत व्यक्त केलं. बीआरएस पक्ष हा एक आघाडीचा पक्ष आहे. बीआरएस भाजपाची बी टीम नाही व काँग्रेसची ए टीम नाही, तसंच बीआरएस पक्ष हा महिलांचा, युवा वर्गाचा पक्ष आहे. बीआरएस शेतकऱ्यांची टीम आहे. विकासासाठी काम करणारा पक्ष आहे. तसंच हरीश राव यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर गंभीर आरोप केले आहेत. येथील राजकारणी सत्तेसाठी सकाळी एका पक्षासोबत तर, संध्याकाळी दुसऱ्या पक्षासोबत असतात. देशात के. चंद्रशेखर राव हे एक फक्त असे लीडर आहेत, ज्यांनी 14 वर्षे लढाई लढून तेलंगाणा राज्याची निर्मिती केली.
तेलंगाणामॉडेल महाराष्ट्रात राबविले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील : तेलंगाणा राज्यात केसीआर यांनी अनोखे मॉडेल राबवले आहे. गेल्या नऊ वर्षात एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. तेलंगाणा मॉडेल महाराष्ट्र राज्यात राबविले तर महाराष्ट्र राज्यातील आत्महत्या थांबतील असं हरीश राव यांनी सांगितलं. येथील राजकीय नेत्यांची ताकद ही सरकार वाचवण्यासाठी नष्ट होत आहे. शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही अशी टीका, राज्यातील शिंदे व फडणवीस सरकारवर केला आहे.
सोलापुरातील झोपडपट्टी भागाला टार्गेट: बीआरएस पक्षाची ताकद दिवसेंदिवस सोलापुरात वाढत चालली आहे. पूर्व भागातील तेलुगु भाषिक नेते बीआरएस पक्षात प्रवेश करत असताना, बीआरएस नेत्यांनी आता सोलापुरातील झोपडपट्टी भागाला टार्गेट केलंआहे. तेलंगाणातील गृहमंत्री महंमद अली यांनी सोलापुरातील मुस्लिम झोपडपट्टी भागात दौरा केला आहे. सोलापुरातील मुस्लिम झोपडपट्टी भागात एमआयएम आणि काँग्रेसचं वर्चस्व आहे. या झोपडपट्टी भागात बीआरएसची एंट्री झाली आहे. शास्त्री नगर, मौला अली चौक, कुर्बान हुसेन नगर, नई जिंदगी भागातील मुस्लिम युवा नेते बीआरएसच्या मंत्र्यांना सोबत घेऊन आपापल्या भागातील दौरे करत असताना मंगळवारी दिसून आले.
भाजपा, काँग्रेसला तगडे आव्हान :आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत भाजपा, काँग्रेसला तगडं आव्हान देत तेलंगाणा राज्यातील बीआरएस पक्षाने सोलापुरात ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. आषाढी वारीला तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या दौऱ्यानंतर सोलापुरातील अनेक तेलुगु भाषिक नेते बीआरएस पक्षात गेले आहेत. आता बीआरएसने मुस्लिम झोपडपट्टी भागाला टार्गेट करत मुस्लिम युवकांना पक्षा प्रवेश करण्याचे आवाहन केले आहे. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजपा आणि एमआयएमला बीआरएस पक्ष मोठं आव्हान उभं झालं आहे.