पंढरपूर -कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पंढरपूरला सुमारे दोनशे बेडची क्षमता वाढवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंढरपूर विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आमदार यशवंत माने, प्रशांत परिचारक, कल्याण काळे, भगिरथ भालके आदी उपस्थित होते.
पंढरपूर शहरातील बेडची क्षमता वाढणार -
पंढरपूर नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारतीत शंभर बेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. यामध्ये सर्व सुविधा खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याचबरोबर डीव्हीपी उद्योग समूहातर्फे अभिजीत पाटील यांचे पन्नास बेड, पडळकर हॉस्पिटलमध्ये तीस आणि गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये तीस बेडची क्षमता वाढवली जाणार आहे.
जिल्ह्यातील मोठया ग्रामपंचायतींना कोविड सेंटर उभारण्यासाठी परवानगी -
सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना कोविड सेंटर उभारण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ग्रामपंचायतीत मधील कोरोना रुग्णांना उपचार दिले जाणार आहेत. पंढरपूरला सध्या पासष्ट एकर परिसरात आणि गजानन महाराज मठात कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आली आहेत. याचबरोबरीने मोठ्या ग्रामपंचायतींना मंजुरी दिली जावी, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या आहेत.