सोलापूर:कुर्डवाडी मधील लउळ येथे 22 वर्षिय हर्षद शंभूदेव शिंदे याने त्याची 65 वर्षिय आज्जी शांताबाई पंढरीनाथ शिंदे यांचा शेतीच्या कमाईच्या वादातून खून केल्याचे समोर आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हर्षद विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पीएसआय हनुमंत वाघमारे हे अधिक तपास करत आहेत.
शेतातील उत्पन्नाचा वाद : पोलीस तपास करत असताना अशी माहिती समोर आली, हर्षद हा आजी आजोबांकडे राहावयास आहे. त्याला दोन आत्या देखिल आहेत. बीकॉम पर्यंत शिकलेल्या हर्षदने आजी शांताबाई शिंदे यांकडे तगादा लावला होता की, शेतातील जे काही उत्पन्न होते, ते आत्याला न देता मला द्या. शेतातील काही जमीन शिल्लक आहे, त्या ठिकाणी उसाची लागवड करायची आहे. आजी आजोबानी हर्षदला शेतात ऊस लागवडीसाठी परवानगी दिली होती.त्यासाठी त्याने ट्रॅक्टर भाड्याने बोलावले होते. ट्रॅक्टरसाठी 20 लिटर डिझेल देखील घरात आणून ठेवले होते.
वृद्ध आजीचा केला खून :रविवारी सकाळी हर्षदचे आजोबा शेतात गेले होते. हर्षद हा आजी शांताबाईसोबत घरातच होता. घरात कोणी नसताना आजी व नातवात पुन्हा शाब्दिक चकमक झाली. रागाच्या भरात हर्षदने स्वयंपाक करत असलेल्या आजीला मारहाण केली. झोपडीतून ओढत बाहेर आणले आणि पेटवून दिले. वृद्ध शांताबाई यांनी आरडाओरडा करताच आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली.
उसाचा फडात लपला :हर्षद शेजाऱ्याना पाहून घटनास्थळवरून पळून गेला व उसाचा फडात लपून बसला होता. वास्तव चित्र पाहणायांच्या ग्रामस्थांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. संशयित आरोपी हर्षद शिंदे यांचे वडील हे पुणे येथे एका शाळेत नोकरी करतात. शेतातील सर्व उत्पन्न आपल्याला मिळावे हे उद्दिष्ट समोर ठेवून हर्षद गेल्या अनेक महिन्यापासून कुर्डवाडी येथील लउळ गावात आजी आजोबाकडे येथे राहावयास होता. तपास करत असताना,हर्षदने कबुली जबाब दिला आहे. आजी आजोबा हे शेतातील सर्व उत्पन्न दोन्ही आत्याना देतात, म्हणून वाद सुरू होता त्यामुळे आजीचा खून केला.अधिक तपास सुरू आहे. न्यायालयाने हर्षदला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती कुर्डवाडी पोलीस ठाण्याचे पीएसआय हनुमंत वाघमारे यांनी दिली