पंढरपूर -भाजप सत्तेत असताना पीक विम्यासाठी शिवसेना अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती. आता शिवसेनेचे सरकार आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा भरून देखील त्यांना विमा मिळालेला नाही. आता शिवसेनेने शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदर गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पंढरपूर तालुक्यातील शेळवे येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन, त्यांनी द्राक्ष बागांची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.
द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई द्यावी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे राज्यामध्ये टाळेबंदी लागू होण्याची दाट शक्यता आहे. याचा फटका राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने द्राक्ष बागाची जबाबदारी घ्यावी, टाळेबंदीच्या भीतीने द्राक्षाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे द्राक्ष बागांचा पंचनामा करून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केली.