सोलापूर- कार्तिक एकादशी सोहळ्यानिमीत्त सर्व धार्मिक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे होणार असून कार्तिक एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी व मनाचे वारकरी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, यावर्षी यात्रा होणार नसल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. 24 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सोलापूरमध्ये संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कोणलाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची प्रतिक्रिया धार्मिक विधी संपन्न होणार-
कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यंदाचे धार्मिक कार्यक्रम पार पडतील. तसेच पौर्णिमेनंतर किंवा त्या आधी पंचगंगा नदीत कोणलाही स्नान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
पंढरपूर शहरासह 11 गावांत संचारबंदी-
पंढरपूर शहरासह 11 गावांत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भाटुंबरे, चिंचोळी, भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोरटी, गादेगाव-शिरढोण, कौठाळी यासह पंढरपूर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु संचारबंदी असली, तरी पंढरपूररून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद करण्यात आल्या नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
कडक पोलीस बंदोबस्त -
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी कार्तिकी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. पण कार्तिकी यात्रेतील सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरेप्रमाणे पार पडणार आहे. संचारबंदी असल्याने मंदिर परिसरात गर्दी होता कामा नये, यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून कोणलाही मंदीर परिसरात सोडले जाणार नसल्याची माहिती एसपी तेजस्वी सातपुते यांनी दिली. तसेच पंढरपूर येथील रहिवासी असेल आणि त्याला पंढरपूरकडे जायचे असल्यास संबंधित व्यक्तीला आधार कार्ड जवळ बाळगणे आवश्यक केले आहे. आधार कार्ड नसल्यास त्याला परत पाठवण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.