महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रामाणिकपणा.. बँकेच्या आवारात पडलेले तीन तोळे सोने केले परत - madha school principal Mandakini Misal news

प्रामाणिकपणा दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालला आहे. एका तरुणाकडून बँकेतून लॉकरमधून काढलेले सोने बँकेबाहेर आल्यानंतर खिशातून पडले. एका मुख्याध्यापिकेच्या प्रामाणिकपणामुळे ते परत मिळाले आहे. यानंतर मुख्याध्यापिका मिसाळ यांनी कष्टाचा पैसा कधीच दगा देत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर, चवरे यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सर्वांसाठीच अनुकरणीय असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले.

माढा हरवलेले सोने केले परत
माढा हरवलेले सोने केले परत

By

Published : Sep 26, 2020, 1:11 PM IST

Updated : Sep 26, 2020, 1:41 PM IST

माढा (सोलापूर) -सध्याच्या जगात जो तो पैशाच्या मागे धावतो आहे. त्यामुळे कोणालाही इतरांना मदत करायला किंवा त्यांच्या समस्यांमध्ये लक्ष घालायला वेळ नाही. शिवाय, प्रामाणिकपणाही दुर्मीळ होत चालला आहे. अशात मौल्यवान वस्तू गहाळ झाल्यास त्या परत मिळणे शक्यता कमीच. मात्र, माढ्यात नुकतेच असे एक उदाहरण पहायला मिळाले. एका तरुणाकडून बँकेतून लॉकरमधून काढलेले सोने बँकेबाहेर आल्यानंतर खिशातून पडले. एका मुख्याध्यापिकेच्या प्रामाणिकपणामुळे ते परत मिळाले आहे.

शुक्रवारी (ता. २५) दुपारी इंदिरा गांधी चौकात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतून लॉकरमधून अभय विलास चवरे यांनी लॉकेट, अंगठी असे दोन तोळ्यांचे सोने काढले होते. ते रुमालात गुंडाळुन खिशात ठेऊन घराकडे जात असताना गडबडीत बँकेच्या परिसरातच हा रुमाल पडला. त्यात गुंडाळून ठेवलेले ३ तोळे सोने बँकेच्या आवारातच पडल्याचे अक्षय यांच्या लक्षात आले नाही.

यादरम्यानच, बँकेत चाललेल्या उपळाई(बुद्रुक) गावातील महाराणी लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी मिसाळ यांना बँकेच्या आवारात पडलेला हो रुमाल दिसला. तो सोडला असता त्यात सोने असल्याचे आढळून आले. मिसाळ यांनी बँकेचे शाखाधिकारी सागर करळे यांना हा रुमाल आणि सोन्याचे दागिने दाखवून आणि ओळख पटवून ज्याचे त्याला ते देण्यास सांगितले. रुमालातील दागिन्याला अभय चवरे यांचे लेबल (नाव)होते. यावरून सागर करळे यांनी अभय चवरे यांच्याशी संपर्क साधून तुमचे सोन्याचे दागिने सोबत आहेत का, अशी विचारणा केली. नुकतेच घरी पोहचलेल्या अभय यांनी खिशात हात घालून पाहिले तर खिशात काहीच आढळले नाही. यावर त्यांची बोलतीच बंद झाली. करळे यांनी खातरजमा केल्यानंतर बँकेत येऊन सोने घेण्यास चवरेंना सांगितले. त्यानुसार मिसाळ यांच्या हस्ते हे सोने चवरे यांच्या स्वाधीन करण्यात आले. बँकेच्या वतीने मंदाकिनी मिसाळ यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल एक प्रामाणिक खातेदार म्हणुन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सध्याच्या मतलबी जगातही मिसाळ यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा निश्चितच कौतुकास पात्र आहे.

बँकेतील या छोटेखानी कार्यक्रमानंतर मिसाळ यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी कष्टाचा पैसा कधीच दगा देत नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 'मला बँकेत आत जात असताना बँक परिसरात रुमाल पडलेला दिसला. रुमाल सोडला असता, त्यात दागिने आढळले. शाखाधिकारी करळे यांना ही गोष्ट सांगितली. चवरे खातेदारांना ओळख पटवून सोने देण्यात आले. माझ्या हातून चांगले काम झाल्याचा मला खूप आनंद होत आहे. कष्टाचा पैसा कधीच दगा देत नाही,' असे मुख्याध्यापिका मिसाळ म्हणाल्या.

सोने परत मिळाल्यानंतर अभय चवरे यांनीही मिसाळ यांचे आभार मानले. 'केवळ शालेय जीवनात प्रतिज्ञा घेण्यापुरताच प्रामाणिकपणा नसावा. तो आचरणातही आणणे गरजेचे आहे. मिसाळ यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा निश्चितच अनुकरणीय आहे. त्यांच्यामुळेच माझे सोने मला परत मिळाले. मी त्यांचा मनापासून आभारी आहे', असे चवरे यांनी म्हटले.

Last Updated : Sep 26, 2020, 1:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details