माढा (सोलापूर) - रविवारी सायंकाळी घरा-घरात गौरीचे आगमन झाले. माढा तालुक्यातील उंदरगाव येथील मुस्लिम कुटूंब गेल्या १० वर्षांपासून गौराईचे स्वागत करीत आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश त्यांनी यातून दिला आहे. अहमद सय्यद असे त्या परिवाराचे नाव असून मागील १० वर्षांपासून सय्यद परिवार गौरी पूजन करतात. यंदाही त्यांनी प्रतिवर्षी प्रमाणेच थाटामाटात गौरीचे स्वागत केले आहे. "सबका मालिक एक है" हा संदेश यानिमित्ताने या परिवाराने दिला आहे. गौरी उभी करण्याबरोबरच सय्यद परिवाराने घरात गणपतीची स्थापना केली असून दररोज गणरायाची पूजा देखील करतात.
रितीरिवाजाप्रमाणे करतात स्थापना -
उदरंगावच्या सय्यद परिवाराने जातींच्या भिंती बाजुला सारून हिंदू रितीरिवाजाप्रमाणे गौरींची स्थापना करण्याची प्रथा जोपासली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणाऱ्या सय्यद कुटूबींयाचे कार्य निश्चितच आदर्शदायी व अनुकरणीय आहे. त्याचे समाजातून कौतुक होत आहे. गौरी उभारण्यासाठी अहमद सय्यद यांना चाॅद, मुन्ना या दोन मुलांसह पत्नी बशिरा, सून शनु याचे सहकार्य लाभत आहे.
माढ्यात 'हे' आहेत विशेष देखावे -
माढ्यातील सन्मतीनगर भागातील स्वाती रामचंद्र उबाळे यांनी रासायनिक शेतीपेक्षा सेंद्रीय शेती कशी फायदेशीर आहे. याचे महत्व महालक्ष्मीसमोर आरास (देखावा) उभा करुन पटवून दिले आहे. दरवर्षी उबाळे या नाविन्यपूर्ण आरास (देखावा) उभी करीत असतात. यंदाची ही त्यांची आरास लक्षवेधी अशीच ठरली. तसेच शहरातील क्रांतीनगर भागातील गणेश देवकर या तरुणाने जागरण गोंधळ या लोक कलेचा ६० बाहुल्याचा वापर करुन हलता देखावा महालक्ष्मी समोर उभा केला आहे. यामध्ये तुळजाभवानी मंदिर व घोड्यावरती बसलेला खंडोबा नवरा नवरी जेवताना उभे केला आहे. दरवर्षी गणेश हा हलत्या देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करीत असतो. यंदा त्यांने जागरण गोंधळ या लोककलेचे चित्रण उत्कृष्टरीत्या आरासीच्या (देखावा) माध्यमातून मांडले आहे. त्याची आरास पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत.