सोलापूर- कोरोना वॉरियर्स म्हणून काम करत असलेल्या घंटा गाडीवरील जवळपास 600 कर्मचाऱ्यांना चार महिन्यांपासून वेतनच मिळाले नाही. उपासमारीची वेळ त्यांच्या कुटुंबावर आली आहे. घंटा गाडीचा ठेका घेतलेला ठेकेदार 600 कर्मचाऱ्यांची मुस्कटदाबी करत आहेत.
शुक्रवारी (दि. 30 ऑक्टोबर) पालकमंत्री सोलापूर दौऱ्यावर असताना घंटा गाडी कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पाया पडून वेतनाची मागणी केली. हे दृश्य बघणाऱ्यांचे डोळे पाणावले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्काळ महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना फोन लावून या घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, असे आदेश बजावले.
मागिल चार महिन्यांपासून वेतन नाही
गेल्या दोन वर्षांपासून हीच परिस्थिती आहे. दरवेळी चार महिने किंवा सहा महिने वेतन थकवली जाते आणि अदा केली जाते. पण, टाळेबंदीपासून भयानक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यात एकही वेतन न मिळाल्याने भिक्षा मागण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
ठेकेदार कंपनीविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा
मागील आठवड्यात समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीवर सदर बझार पोलीस ठाण्यात 58 लाखांचा भ्रष्टाचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सभागृह नेता व नगरसेवक सुरेश पाटील यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेऊन समीक्षा कन्स्ट्रक्शन या कंपनीने सोलापूर महानगरपालिकेत 58 लाखांऐवजी 2 ते 3 कोटींचा कचरा घोटाळा केला आहे, अशी माहिती दिली. पण, याचा फटका घंटागाडीवर काम करणाऱ्या चालक आणि मजूर यांना सोसावा लागत आहे.
नोंदवहीत नावे पेनाने तर वेतनाचा आकडा पेन्सिलने
घंटा गाडीवरील कर्मचाऱ्यांच्या पेन्सिलने लिहिलेल्या मस्टरवर सह्या घेऊन पगार दिली जाते. नंतर खाडाखोड करून वेतनाच्या आकडेवारीमध्ये बदल केला जात आहे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. नाव आणि सह्या पेनाने होतात. वेतनाचा आकडा मात्र पेन्सिलने का लिहिला जातो, असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. याबाबत काही कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडे काही विचारणा केली असता कामावरून काढून टाकू, अशी धमकी ठेकेदाराकडून दिली जात आहे.