सोलापूर : 'यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहेत. यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडळांना महापालिकेची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. तसेच सार्वजनिक मंडळाची गणेश मूर्ती चार फूट, तर घरगुती गणपती दोन फुटाचा असावा. गणपती आणताना व विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही', असे परिपत्रक महानगरपालिका प्रशासनाने काढले आहे. सावित्रीबाई फुले सभागृह येथे महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली गणेशोत्सव संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सर्व सोलापूरकरांना कोरोना नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
आरोग्य उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
'सर्व गणेश भक्तांनी शाडूच्या मातीची मूर्ती स्थापन करावी. या मूर्तींचे घरीच विसर्जन करावे. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करता आरोग्य विषयक उपक्रम सार्वजनिक मंडळाने राबवावे. यंदाचे गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करावे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरातच गणपती विसर्जन करावे', असे आवाहन पालिकेने केले आहे.