सोलापूर (माढा) -सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. ग्रामीण भागात देखील कोरोनाने आपले पाय पसरले आहेत. कुर्डूवाडीच्या स्मशानभूमीत शनिवारी एकाच दिवशी ८ कोरोनाबाधितांवर अत्यंविधी करण्यात आला. दुपारी दोन वाजता हे अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूनंतरही आपल्या जीवलग व्यक्तीच्या जवळ जाता येत नसल्याची खंत मनात ठेवून आठही जणांच्या कुटुंबातील नातेवाईक एका कोपर्यात ओक्साबोक्शी रडत होते. स्मशानभूमितील परिस्थितीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.
नागरिक मात्र बेफिकीर -
शनिवारी कोरोनामुळे शहरात एकाचवेळी आठ जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले. तर दुसरीकडे मात्र कुर्डूवाडीच्या चौका-चौकात अनेक नागरिक विनाकारण फिरताना दिसले. यावरून लोकांना कसलेही गांभिर्य नसल्याचे दिसते आहे. पोलिसांच्या काठीचा प्रसाद मिळाल्यावरच नागरिकांना शिस्त लागणार का? असा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
सोलापुरात रूग्ण अन् मृतांचा आकडा वाढतोय -
सोलापूर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. बुधवारी (दि. 14 एप्रिल) एकाच दिवशी सोलापुरात 976 रुग्ण आढळले आहेत. तब्बल 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. शहरात 307 कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली आहे. शहरातील 8 रुग्ण उपचार घेत असताना दगावले होते. आज सकाळपासून दुपारपर्यंत सुमारे 12 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गुरूवारी आणि शुक्रवारी देखील अशीच परिस्थिती होती.