सोलापूर- महापालिका उपायुक्त धनराज पांडेंना पाच लाख रुपयांची खंडणी मागून शिवीगाळ करणारा फरार उपमहापौर राजेश काळे यांना मंगळवारी (दि. 5 जाने.) सकाळी रुपाभवानी मंदिर परिसरातून अटक केले आहे. ही कारवाई सोलापूर शहर गुन्हे शाखेने केली आहे. उपायुक्त धनराज पांडेंना शिविगाळ केल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 29 डिसेंबरला याबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
पुण्याहून तुळजापूरकडे निघाला होता
29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर राजेश काळे हे गायब होता. त्याच्याविरोधात भा.दं.वि.चे कलम 353, 385, 294 प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. आज (मंगळवार) सकाळी पुण्याहून तुळजापूरकडे जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने रुपाभवानी मंदिरात सापळा लावला होता. राजेश काळे मंदिर परिसरात मोटारीतून येताच त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी धडपड सुरू केली. राजेश काळे हे पळून जाण्याचा तयारीत असताना, त्याचा पाठलाग करून मंदिर परिसरात त्याच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.
सोशल मीडियावरून ऑडीओ क्लिप व्हायरल
उपमहापौर राजेश काळे हे पालिका उपायुक्त धनराज पांडे यांना शिविगाळ करत असल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यावरून सोलापूर महानगरपालिकेत चर्चेचा विषय झाला होता. भाजप पक्षानेही उपमहापौर काळे विरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उचलला आहे. भाजप आमदाराच्या 'लोकमंगल' या सामाजिक संस्थेच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी उपमहापौर काळे हे 'ई-टॉयलेट' मागत असल्याचेही त्या ऑडीओ क्लिपमध्ये आहे.