सोलापूर - लक्ष्मी मार्केटमधील फळ विक्रेत्यांवर आणि भाजी विक्रेत्यांवर रविवारी सकाळी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाई विरोधात विक्रेत्यांनी आपली नाराजी व्यक्त करत फौजदार चावडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.
कोरोना संसर्गजन्य महामारी रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून सोलापूरातील अनेक भाजी मंड्या बंद आहेत. जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरातील होम मैदानावर भाजी व फळ विक्री करावी, असा आदेश आहे. या आदेशाला झुगारुन विजापूर वेस येथील लक्ष्मी मार्केटमध्ये रविवारी फळ विक्रेते व भाजी विक्रेते हाथ गाड्यावर व खाली बसून फळे, भाजी विकत होते. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत फळे, भाजी व हातगाड्या जप्त करत कारवाई केली. या कारवाई वेळी भाज्यांचे व फळांचे नुकसान झाले.
पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत विक्रेत्यांनी मोर्चा काढत फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठले. गेल्या तीन महिन्यांपासून हातावर पोट असणारे विक्रते कसेबसे तरी जीवन जगत आहेत. कर्ज काढून, हाथ उसने पैसे घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत. व्यवसाय करण्यासाठी देखील रोख रक्कम हातात नाही. उधार माल घेऊन फळ व भाजी विक्री करत आहेत. त्यात असा कारवाईने आर्थिक नुकसान झाले आहे. आम्हाला कामधंदा द्या, असे म्हणत हा मोर्चा पोलीस ठाण्यावर धडकला.