सोलापूर- शहरातील सोरेगाव हद्दीत सुरू असलेल्या शेळीपालन संदर्भातील एका कंपनीने कोट्यवधीची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. बरकत गोट फार्म असे त्या कंपनीचे नाव असून शेळी पालन व्यवसायात गुंतवणूक करायला लावून या कंपनीने कर्नाटक आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूक दारांची फसवणूक केली आहे. सोरेगाव हद्दीतील बरकत गोट फार्मच्या अकीबखान हारूनखान पठाण( रा ,श्री शैल मल्लिकार्जुन नगर, होटगी रोड, सोलापूर)याने ही फसवणूक केली आहे. सध्या हा संशयित आरोपी फरार आहे. तर त्याचा साथीदार अलीनवाज इमाम सय्यद(रा नई जिंदगी, सोलापूर) यास आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या शेळी पालन व्यावसायात जवळपास 3 कोटी 23 लाख रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विजापूर रोडवरील अल हिलाल बिजनेस कन्सेप्ट ( पत्ता.वॉटर फ्रंट इमारत,विजापुर रोड) या कंपनीच्या माध्यमातून लोकांना पैसे गुंतवणूक करून मोठा परतावा दिला जाईल, असे आमिष दाखवण्यात आले. अल हिलाल ही कंपनी बरकत गोट फार्मची शाखा आहे. येथूनच अकिबखानने घोटाळ्यास सुरुवात केली. 2017 पासून या कंपनीमध्ये काही नागरिकांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यानुसार कंपनीमध्ये जवळपास 3 कोटी 23 लाख 5 हजार 500 रुपयांची गुंतवणूक झाली. परंतु गेल्या डिसेंबर 2019 पासून अल हिलाल या कंपनीने विजापूर रोड वरील वॉटर फ्रंट इमारती मधील कार्यालय बंद केले आणि गुंतवणूक दारांचे पैसे देण्यासही टाळाटाळ केली.