सोलापूर - शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावावर महसूल खात्यातील एका निवृत्त कर्मचाऱ्याची आठ लाखांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. किसन माणिकराव पोतदार, असे आरोपीचे नाव आहे.
शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावावर निवृत्त कर्मचाऱ्यास आठ लाखांचा गंडा - solapur crime news
शासकीय नोकरी लावून देण्याच्या नावावर महसूल खात्यातील एका निवृत्त कर्मचाऱ्याची आठ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. किसन माणिकराव पोतदार, असे आरोपीचे नाव आहे.
शिवशंकर बसप्पा रामपुरे (वय 67) रा.धोत्री ता. दक्षिण सोलापूर, असे तक्रारदाराचे नाव आहे. शिवशंकर रामपुरे व आरोपी किसन पोतदार हे दोघे वर्गमित्र आहेत. रामपुरे यांनी आरोपीला आपला मुलगा सरकारी नोकरीच्या शोधात असल्याचे सांगितले. यावेळी किसन पोतदार याने व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचलनालय मुंबई येथे कनिष्ठ लिपिक पदाच्या जागा निघाल्या असून नोकरी लावून देण्याची हमी दिली. त्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. शिवशंकर यांनी किसनला 8 लाख रुपये दिले.
दरम्यान, शिवशंकर यांच्या मुलाने कनिष्ठ लिपिक पदाचा ऑनलाइन अर्ज भरला व लेखी परीक्षा देखील दिली. मात्र, तो परीक्षेत नापास झाला. पदभरती नियंत्रण समितीने पुढील तोंडी परीक्षा व मुलाखतीला तक्रारदाराच्या मुलाला बोलावले नाही. त्यामुळे शिवशंकर यांनी किसन पोतदारला पैसे परत मागितले. आरोपीने 14 एप्रिल 2017 रोजी 9 लाख 76 हजार रुपयांचा समर्थ बँकेचा धनादेश दिला. परंतु, हा धनादेश(चेक) वटला नाही. तसेच शिवशंकर यांनी पैशाची मागणी केली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दाईगडे करत आहे.