सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर असलेल्या मोहोळ जवळील यावली गावाजवळ मालट्रक आणि इको कारचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले आहेत. ही दुर्दैवी घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. कारमधील सर्वजण तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला आहे.
भाविकांवर काळाची झडप :मोहोळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रांजणगाव (ता. पारनेर, जिल्हा अहमदनगर) येथील महिला भाविक इको कार या वाहनातून तुळजापूरला दर्शनासाठी चालले होते. इको कारने यावली गावच्या परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. अपघातात दोन महिला भाविक व कारचालक जागीच ठार झाले आहेत. एका महिला भाविकाचा सोलापूर सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सहा महिला भाविक जखमी झाल्या आहेत, अशी प्राथमिक माहिती मोहोळ पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू :सोलापूर-पुणे महामार्गावर झालेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. आदम अली मुनवर अली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय ६० रा. ता. पारनेर) अशी मृतांची नावे आहेत. द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४० रा. राजंनगाव मशीद) यांना सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारास दाखल करताना त्यांचा मृत्यू झाला.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू :मोहोळ पोलिसांनी जखमींना सोलापूर शहरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. बळी बाबु पवार (वय २७), छकुली भिमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७ वर्षे), मंदाबाई नाथा पवार (वय ५२ वर्षे), सुरेखा भारत मोरे (वय ४५ वर्षे), बायजाबाई रामदास पवार (वय ६०, सर्व रा. राजंनगाव, जि. अहमदनगर) हे जखमी झाले आहेत. मोहोळ पोलीस ठाण्यातील टोलनाक्याचे पेट्रोलिंग ऑफिसर मलिकार्जुन बळीराम बजुलगे यांनी अपघाताची खबर दिली आहे.
हेही वाचा:
- Video : दाट धुक्यामुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटले; अपघातात दोन गंभीर
- नाशकात ३ ट्रक अन् एका कारचा अपघात, ट्रकमधील परप्रांतीय मजूर जखमी
- Truck And Car Accident Raigad: दोन अपघातात चौघांचा मृत्यू; ट्रक आणि कारची समोरा-समोर धडक