पंढरपूर -तब्बल40 लाखांची सुपारी घेऊन एकास जिवे मारण्यासाठी तयारीत असणाऱ्या चौघांना शहर पोलिसांनी जेरबंद केले. देशी बंदूक, कोयता, कुऱ्हाड, स्टीलचा पाईप या वस्तूही त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत, माहिती पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.
या प्रकरणी बंडू दामू मासाळ (रा. धाहीटी ता. सांगोला), हनुमंत भरत जाधव, बंडू सिद्धेश्वर घोडके (रा. बोहाळी ता. पंढरपूर), बापू उर्फ आप्पा शिवाजी गोडसे (रा. कौठाळी ता. पंढरपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा -उत्तन पोलीस ठाणे हद्दीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड
नागनाथ शिवाजी घोडके (रा. इसबावी, पंढरपूर) यांनी 'माझ्या जीवाला धोका आहे. मला आपण वाचवू शकता' अशी मदतीची मागणी पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्याकडे केली. याच माहितीच्या आधारावर कदम यांनी गुन्हे अन्वेषण शाखा प्रमुख राजेंद्र गाडेकर यांना तत्काळ यावर कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या. गाडेकर यांनी तत्काळ सूत्रे फिरवत अधिक माहिती घेतली. पंढरपूर येथील सोलापूर मार्गावरच्या जुना दगडी पूल येथे सापळा रचून हनुमंत जाधव, बंडू घोडके, बंडू मासाळ व बापू गोडसे यांना कारमधून जाताना थांबवण्यात आले. त्यांच्याकडे बंदूक, कुऱ्हाड, कोयता यासारखी शस्त्रे आढळून आली.
या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता, चौकशीअंतर्गत नागनाथ घोडके यांना मारण्यासाठी संतोष कोकरे यांनी 40 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे. घोडके यांचे आप्पा गोडसे यांच्यासोबत जुने भांडण होते. तर, संतोष कोकरे यांच्यासोबत जमिनीच्या व्यवहारामधून वाद झाला होता. त्यातूनच बंडू घोडके याला नागनाथ घोडके यांना ठार मारण्यासाठी 40 लाखांची सुपारी देण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्या चौघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
दरम्यान, पोलीस कर्मचारी सूरज हेंबाडे, शोएब पठाण, समधान माने, गणेश पवार, इरफान शेख, सिध्दनाथ माने, सुजित जाधव यांनी ही कारवाई केली आहे.
हेही वाचा -सुशिक्षित गुन्हेगारांची वाढती संख्या, चिंतेचा विषय