सोलापूर - भाजपाचे सोलापुरात ऑपरेशन लोटस सुरू झाले आहे. शिवसेनेला मोठी खिंडार पडल्यानंतर आता राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्यास त्यांनी सुरूवात केली आहे. मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील ( Former NCP MLA Rajan Patal ) व माढा मतदार संघातील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे ( MLA Baban Shinde ) सोमवारी दिल्लीत भाजप कार्यालयात आले होते. तेथे ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज नेते भाजपच्या गोटात दिसल्याने सोलापुरात चर्चेला उत आले आहे.
पक्षांतर केलेले नेते विरोधकांच्या बाकावर बसले -२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेनं जोरदार यश मिळवल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षांतर केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना विरोधात बसण्याची वेळ आली.
शिवसेना नंतर आता राष्ट्रवादीला धक्के -अडीच वर्षानंतर उद्धव ठाकरे सरकार गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आणि भाजपच्या पाठिंब्यावरील सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेसोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील धक्के बसू लागले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी आली होती. आता, सोलापूरच्या मोहोळमधील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील व विद्यमान आमदार बबन शिंदे देखील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरु आहेत. राजन पाटील आणि बबन दादा शिंदे यांच्या दिल्ली वारीमुळे सोलापुरात राष्ट्रवादीला जबर धक्का बसणार आहे.