सोलापूर - माढा तालुक्यातील माजी आमदार धनाजी साठे यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. त्यांनी आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्याबरोबर त्यांचे पुत्र आणि कुर्मुदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी साठे कुटुंबीयांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तब्बल ६ वर्षानंतर साठे कुटुंबीयांनी घरवापसी केली आहे.
माढा तालुक्यातील साठे कुटुंबीय हे एकनिष्ठ काँग्रेसचे मानले जात होते. सातत्याने ते काँग्रेसबरोबर राहिले होते. मात्र, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दादासाहेब साठे यांना काँग्रेसने तिकीट नाकारल्याने नाराज होऊन साठेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपमध्येही त्यांची अपूर्ण राहीलेली विकासाची कामे केली नसल्याचे साठे यांनी सांगितले.