महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारा ना छावणीला ना दावणीला; माढा तालुक्यातील स्थिती

माढा तालुक्यातील अंजनगाव येथील शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या जनावरांसाठी चारा आणि पाणी कुठून आणायचा या चिंतेत आहेत. पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या जनावरांना आता चारा आणि पाणी याचा प्रश्न सतावत आहे.

चारा ना छावणीला ना दावणीला; माढा तालुक्यातील स्थिती

By

Published : May 14, 2019, 7:49 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दुष्काळी झळा सोसणाऱ्या माढा तालुक्यातील जनावरांना 'ना छावणीला चारा, ना दावणीला चारा' अशी परिस्थिती असल्यामुळे तालुक्यातील पशुपालक चिंतातूर झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जनावरांना चारा हा छावणी किंवा दावणीला देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र माढा तालुक्यात जनावरांसाठी छावणीत चारा नाही आणि दावणीतही चारा नाही, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

चारा आणि पाणी समस्येविषयी बोलताना शेतकरी...


माढा तालुक्यातील अंजनगाव येथील शेतकरी त्यांच्याकडे असलेल्या जनावरांसाठी चारा आणि पाणी कुठून आणायचा या चिंतेत आहेत. पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या जनावरांना आता चारा आणि पाणी याचा प्रश्न सतावत आहे. सरकारने सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांमध्ये चारा छावण्या सुरू केल्या असल्या तरी, इतर तालुक्यात मात्र जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत. दुष्काळाचा प्रश्न हा माढा तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र माढा तालुक्यात साखर कारखाने आणि उसाचे क्षेत्र जास्त असल्यामुळे या तालुक्यात चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाहीत.


चारा छावण्या सुरू झाल्या नसल्या तरीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे, चारा छावणीत नाही तर किमान दावणीला चारा मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्याची आहे. त्यामुळेच शेतकरी बँकेत जाऊन त्यांचे पासबुक तपासत आहेत. मात्र सरकारने सांगितल्याप्रमाणे जनावरांना चारा देण्यासाठी आपल्या बँक खात्यावर पैसे जमा झालेत का हे पाहण्यातच त्यांचे दिवस निघून चालले आहेत. दरम्यान त्यांच्या जनावरांना चारा हा, 'ना छावणीला, ना दावणीला' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


अशी व्यथा एका शेतकऱ्याची -
माढा तालुक्यातील शेतकरी नवनाथ जाधव यांच्याकडे फक्त 2 एकर शेती आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी म्हशी आणि 4 शेळ्या पाळलेल्या आहेत. दुष्काळी परिस्थितीत या म्हशी आणि शेळ्यांना जगवण्यासाठी जाधव यांनी कडबा विकत आणला. आता सद्या ते 25 हजार रुपये खर्चून 1 हजार पेंढ्या या जनावरांना खाऊ घालत आहेत. मात्र काही दिवसातच हा चाराही संपणार आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा बिकट झालेला असताना देखील त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याचा आरोप नवनाथ जाधव यांनी केला आहे.


काही दिवस पुरेल इतका कडबा त्यांच्याकडे आहे. चाऱ्याचा समस्येनंतर त्यांना पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सध्या 2 किलोमीटर अंतरावरून मोटर सायकलला घागरी बांधून जनावरांची तहान भागवण्याचे काम जाधव यांच्या कुटुंबाकडून केले जात आहे. 25 रुपयाला एक कडब्याची पेंढी विकत घेऊन जनावरांना खाऊ घालण्याची वेळ शेतकऱयांवर आली आहे. सरकार मात्र, याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details