सोलापूर - उजनी धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे प्रकल्पातून 30 हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. याव्यतिरिक्त वीज निर्मितीसाठी देखीव 1 हजार 600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वीर धरणातून 800 क्युसेक पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. परिणामी भीमा नदीची पाणी पातळी वाढली असून पंढरपूरजवळ पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पंढरपूर तालुक्यात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे बुधवारी रात्री पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, सांगोला या तालुक्यात मुसळधार पावासाची नोंद झाली. या पावासामुळे पंढरपूर तालुक्यातील आंबे, चाले, वाखरी, सरकाली, चंद्रभागा नदी काठच्या काही गावांचा संपर्क तुटला व शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यात सरासरी पावसाच्या ११६ टक्के म्हणजेच ४५५ मिमी पाऊस झाला आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर वगळता इतर तालुक्यात १०० टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. बार्शी तालुक्यात सर्वाधिक ५८८ मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पावसाचे प्रमाण -
उत्तर सोलापूर ३८०.५०मिमी (८२.२० टक्के), दक्षिण सोलापूर ३५३.६०मिमी (७९.४० टक्के), बार्शी ५५८.१०मिमी (१२६.३० टक्के), अक्कलकोट ४७०.३०मिमी (१०३ टक्के), मोहोळ ४४३मिमी (११९.८० टक्के), माढा ४७५.७०मिमी(१२२.५० टक्के), करमाळा ४२४.३०मिमी (११४.३० टक्के), पंढरपूर ४५६.९०मिमी (११५.७० टक्के), सांगोला ४३१.७०मिमी (११६.९० टक्के) माळशिरस ४९१.१०मिमी (१४१ टक्के), मंगळवेढा ४५६.५०मिमी (१३३ टक्के)