माढा (सोलापूर) - माढा तालुक्यात कोरोना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या आकडेवारीतही मोठ्या प्रमाणात भर पडत आहे. कोरोनामुळे टेंभूर्णी गावातील भैय्या शेख यांच्या ७ सदस्यांच्या कुटुंबातील तब्बल ५ जणांचा अवघ्या १० दिवसात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे माढा तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोनाच्या या मृत्यू तांडवामुळे प्रशासनाचा ढिसाळपणाही उघडा पडत आहे.
टेंभूर्णी येथील रहिवासी भैय्या शेख यांच्या घरातील ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये वडिल हनिफ मौला शेख (६८ वर्षे) यांचा २७ एप्रिलला मृत्यू झाला. तर १ मे रोजी आई ईल्लला हनिफ शेख (६१ वर्षे) यांचा मृत्यू झाला. नंतर भाऊ इक्बाल हनिफ शेख (३१ वर्षे) आणि सावत्र आई रुक्साना हनिफ शेख (५५ वर्षे) या दोघांचा एकाच दिवशी म्हणजे ५ मे रोजी कोरोनाने बळी घेतला. भैय्या शेख यांच्या परिवारावर घाला घालणाऱ्या कोरोनाने ६ मे रोजी पत्नी अर्जिया भैय्या शेख (२४ वर्षे) यांचाही बळी घेतला. त्यामुळे अवघ्या १६ महिन्यांच्या सारा शेखला पोरकी झाली आहे.
भैय्या शेख यांचा टेंभूर्णीत पाण्याच्या टँकरचा व्यवसाय आहे. या व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू असतानाच शेख यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला. सुरुवातीला हनिफ शेख यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे घरात संपर्कात असलेल्या सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात सर्वजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर सर्वांनी उपचार सुरू केले. यातून केवळ भैय्या शेख कोरोनातून बरे झाले. तर इतर ५ जणांचा कोरोनाने बळी घेतला.
१६ महिन्यांची सारा पोरकी झाली
भैय्या शेख यांच्या पत्नीचाही या कोरोनामुळे बळी गेला. मात्र, आई कुठे गेली म्हणून विचारणाऱ्या चिमुकल्या साराला ती उद्या येईल, अशी खोटी समजूत काढण्याशिवाय भैय्या शेख यांच्याकडे दुसरा मार्ग उरला नाही.
'ढिसाळ यंत्रणेमुळे गेले बळी' शेख यांचा आरोप