महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

KK Express Fire : के.के. एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये आग, चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात टळला

बंगळुरुहुन दिल्लीकडे निघालेल्या के. के. एक्सप्रेसच्या इंजिनने मोहोळ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर घाटणे गावाजवळ पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून वेळेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

KK Express Fire
KK Express Fire

By

Published : Jul 2, 2023, 10:49 PM IST

केके एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये आग

सोलापूर :बंगळुरू ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या के. के. एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली होती. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे पोहोचण्याआधी इंजिनमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून ट्रेन थांबविली व आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग विझवताना रेल्वे चालक होरपळून जखमी झाला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चालकाचे प्रसंगावधान : बंगळुरुहुन दिल्लीकडे निघालेल्या के. के. एक्सप्रेसच्या इंजिनने मोहोळ रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर घाटणे गावाजवळ पेट घेतला. इंजिनमध्ये आग लागल्याचे रेल्वे चालक विकासकुमार याच्या लक्षात आले. त्याने तात्काळ प्रसंगावधान राखत गाडीचा वेग कमी करीत गाडी बंद केली. गाडी थांबल्यानंतर खाली उडी मारून त्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांमध्ये रेल्वेचालक आगीने होरपळला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याला रेल्वेतील पोलिस कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने प्राथमिक उपचारासाठी मोहोळच्या रुग्णालयात दाखल केले.

मोठा अनर्थ टळला : रेल्वेच्या इंजिनला आग लागल्यानंतर इंजिन मधून धूर निघत होता. रेल्वे चालकाने गाडी थांबवून आग दुसऱ्या डब्यापर्यंत पोहोचू नये यासाठी अग्नीरोधक उपकरणांचा उपयोग सुरू केला. दुसऱ्या डब्यातील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी देखील आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. घाटने येथील ग्रामस्थांना आगीची बाब लक्षात आल्यावर त्यांनी देखील आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर काही वेळातच रेल्वेमधील आग आटोक्यात आली, व मोठी हानी टळली.

रेल्वे वाहतुकीवर परिणाम : के.के.एक्सप्रेसच्या इंजिन मध्ये लागलेल्या आगीनंतर चालकाने प्रसंगावधान राखत घाटने परिसरात गाडीला थांबवले व नियंत्रण कक्षाला माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच लाईन वरून जाणाऱ्या सर्व रेल्वे एक्सप्रेसला थांबा दिला. चेन्नई एक्सप्रेसला मोहोळ स्थानकात थांबा देण्यात आला होता. के.के.एक्सप्रेस जवळपास दोन तास घाटने परिसरात थांबली होती. आग आटोक्यात आल्यानंतर गाडी इंजिन बदलून दौंडकडे मार्गस्थ करण्यात आली. या आगीच्या घटनेत कुठलीही मोठी जीविहानी झाली नसून चालक मात्र आग विझवताना भाजून जखमी झाला आहे. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या इतर एक्सप्रेस गाड्यांवर देखील परिणाम झाला आहे.

हेही वाचा :

  1. Solapur Accident : स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला, भीषण अपघातात 6 जण ठार

ABOUT THE AUTHOR

...view details