सोलापूर FIR On BJP MLA :शहरात शनिवारी सायंकाळी मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा रवाना होताना मधला मारुती परिसरात किरकोळ दगडफेक झाली होती. जवळपास तीन ते चार दुकानांचं नुकसान झाले होते. मोर्चाचे नेतृत्व भाजपा आमदार नितेश राणे आणि तेलंगाणा राज्यातील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी केले होते. यावेळी चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे आणि आमदार टी राजा सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोर्चात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप :सोलापुरात आमदार नितेश राणे आणि टी राजा सिंह यांची सभा झाली. या सभेत भाषणादरम्यान नितेश राणे आणि टी राजा सिंह यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल, असं प्रक्षोभक भाषण करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. एका विशिष्ट समाजाला टार्गेट करून लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असं भाषण केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. या प्रकरणी सोलापूर पोलिसांनी जेलरोड पोलीस स्टेशन इथं भाजपा आमदार नितेश राणे आणि तेलंगाणा राज्यातील भाजपा आमदार टी राजासिंह यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिली होती नोटीस :सोलापूर शहरात मोर्चा आणि सभा आयोजित केली जात असल्याची प्रसिद्धी माध्यमांतून माहिती प्रसारित झाली होती. त्यानंतर सोलापुरात सभेला आणि मोर्चाला विरोध झाला होता. पोलिसांनी लोकशाही मार्गानं मोर्चा आणि सभा संपन्न होणार असल्याचं लेखी हमीपत्र आयोजकांकडून लिहून घेतलं होतं. तरी देखील सभेत भाजपा आमदार नितेश राणे आणि तेलंगाणा राज्यातील भाजपा आमदार टी राजा सिंह यांनी भाषणा दरम्यान एका विशिष्ट समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या जातील, असं प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सोलापुरातील दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल :शनिवारी सायंकाळी मधला मारुती परिसरातून मोर्चा जाताना काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ केला. यामध्ये चार दुकानावर दगडफेक करण्यात आली होती. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी सतीश दिलीप शिंदे, शेखर शिवानंद स्वामी यांच्यासह बारा ते पंधरा जणांवर भादवि कलम 295,295 (अ), 143, 147, 149 या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी पोलिसांनी जेलरोड पोलीस स्टेशन इथं तक्रार दाखल केली आहे. सहायक फौजदार देविदास वाल्मिकी यांनी भाजपा आमदार नितेश राणे, सुधाकर बहिरवाडे, भाजपा आमदार टी राजा सिंह यांच्यासह व्यासपीठावरील 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
- ..अन्यथा गाठ मराठ्यांशी; नितेश राणेंचा मनोज जरांगे पाटलांना इशारा
- अयोध्येत पापी लोकांना बोलावलं नाही; नितेश राणे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल