सोलापूर- भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीवर शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख या रॅलीत सहभागी होते. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजपच्या विजय संकल्प रॅलीवर सोलापुरात गुन्हा दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन - भाजप
सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकताच जमावबंदी आदेश लागू केला होता. चार पेक्षा जास्त लोक एकत्रित येणे, घोषणाबाजी करणे यासह विविध प्रकारांवर बंदी घालण्यात आली होती.
भारतीय जनता पक्षाच्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्यावतीने रविवारी विजय संकल्प मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. येथून पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमदार आहेत. या रॅलीत पालकमंत्र्यांसह महापौर शोभाताई बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बतुल सभागृहनेते संजय कोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकताच जमावबंदी आदेश लागू केला होता. चार पेक्षा जास्त लोक एकत्रित येणे, घोषणाबाजी करणे यासह विविध प्रकारांवर बंदी घालण्यात आली होती. हा आदेश असतानादेखील सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोणतीही परवानगी न घेता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय संकल्प रॅली काढली.
जमावबंदी आदेश लागू असताना ही रॅली काढण्यात आल्यामुळे जेलरोड पोलिसांनी रॅलीच्या संयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आनंद बिरू आणि अनिल कंदलगाव या दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.