सोलापूर -भीमा नदी पात्रात लवंगी येथील तानवडे व पारशेट्टी परिवारातील चारजण वाहून गेल्याची घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडल्याची माहिती मंद्रुप पोलिसांनी दिली होती. समीक्षा शिवाजी तानवडे (वय 13 वर्ष) अर्पिता शिवाजी तानवडे (वय 12 वर्ष) आरती शिवानंद पारशेट्टी (12 वर्ष) विठ्ठल शिवानंद पारशेट्टी (वय 10 वर्ष) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत. रविवारी सकाळपासून वाहून गेलेल्या मुलांचा शोध सुरू होता. पोलिसांनी बचावकार्याला पाचारण केले होते. यात तीन मुलांचे शव बाहेर काढण्यास बचावकार्याला यश आले आहे. शिवाय एकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन थिटे यांनी दिली आहे.
'या' दिवशी घडली होती घटना
शिवाजी रामलिंग तानवडे (वय 40 वर्ष रा. लवंगी ता. दक्षिण सोलापूर) हे शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास भीमा नदी पत्रात पोहायला गेले होते. नदीत पोहायला गेलेल्या वडिलांच्या मागे अर्पिता व समीक्षा या दोन्ही मुली गेल्या. तसेच, तानवडे यांचा नऊ वर्षांचा मुलगा विठ्ठल पारशेट्टी व अकरा वर्षांची मुलगी आरती पारशेट्टी हे दोघेही नदीच्या दिशेने गेले होते. तानवडे यांच्या 12 वर्षीय मुलीला व त्यांच्या बहिणीच्या 12 वर्षीय मुलीला पोहायला येत असल्याने त्या दोघीही नदीत उतरल्या. त्यानंतर नदी काठावरील तानवडे यांची नऊ वर्षीय मुलगी आणि बहिणीचा 11 वर्षांचा मुलगाही पाण्यात उतरला. परंतु, प्रवाह वाढल्याने चारही मुले वाहून जाताना शिवाजी तानवडे यांनी पाहिले. शिवाजी तानवडे यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने चारही मुले वाहून गेली होती.