पंढरपूर (सोलापूर) - सांगोल्याचे 55 वर्षे आमदार म्हणून मतदारसंघाचे काम पाहणारे व विधानसभेचे विद्यापीठ म्हणून राज्यभर ओळख असलेले भाई गणपत देशमुख यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगोला शहरातील सांगोला सूतगिरणी मैदानामध्ये माजी मंत्री गणपत आबा देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय लोटला होता. 'आबा साहेब अमर रहे अमर रहे', 'आबासाहेब तुम अमर रहे' अशा प्रकारच्या घोषणांनी लाडक्या नेत्याला नागरिकांनी निरोप दिला. त्यांचे सुपुत्र बाबासाहेब देशमुख यांनी गणपतराव देशमुख यांच्या पार्शिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे सोलापूर सांगली जिल्ह्यातील आमदार, खासदार या वेळेस उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाकडून गणपत आबा देशमुख यांना मानवंदना..
माजी मंत्री गणपत आबा देशमुख यांना जिल्हा पोलीस प्रशासनाकडून मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी यांना पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते तिरंगा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस दलाकडून माजी आमदार गणपत आबा देशमुख यांना बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर जिल्हा अधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.