माढा (सोलापूर) -माढा शहरातीलयावली-सालसे राज्य मार्गाचे काम संथ गतीने आहे. दीड वर्षे पूर्ण होऊनही रस्त्याचे काम होत नसल्याने अपघाताचे आणि धुळीचे प्रमाण वाढले. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार त्यांच्या सोयीनुसार काम करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या शहराध्यक्ष शंभु साठे यांनी केला. तसेच अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले. गुन्हा दाखल न झाल्यास या निषेधार्थ १मे महाराष्ट्र दिनी ठिय्या आंदोलन तहसील कार्यालयाच्या समोर करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
संथगतीने रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करा
दीड वर्षे पूर्ण होऊनही रस्त्याचे काम होत नसल्याने अपघाताचे आणि धुळीचे प्रमाण वाढले. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार त्यांच्या सोयीनुसार काम करीत असल्याचा आरोप शिवसेनेच्या शहराध्यक्ष शंभु साठे यांनी केला. तसेच अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आले.
जंगदंबा सुतगिरणी ते श्री माढेश्वरी मंदिरा पर्यंतचे शहरातील काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. हा रस्ता गेल्या वर्षभरापासून खोदलेला आहे. साठे गल्लीतील काम अर्धवट स्थितीत आहे. तसेच रस्तावरील धुळीने नागरिक त्रस्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते साठे गल्ली रूकडोबा मंदिर या दरम्यानच्या एका रस्त्याची बाजू पूर्णपणे खोदल्याने रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढलेले आहे. याचा परिणाम लहानांसह ज्येष्ठ नागरिकांवर होत आहे. मार्गाच्या कडेने विद्युत तार व पोल असून ते धोकादायक स्थितीत आहे. यासंदर्भात अनेकदा लेखी व तोंडी तक्रारी तसेच आंदोलने करण्यात आली. मात्र कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सोपवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास या निषेधार्थ १ मे महाराष्ट्र दिनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. शिष्टमंडळात शहराध्यक्ष शंभु साठे, गौतम शिंदे, भैय्या खरात, बशीर आतार, नागनाथ कदम, शरद वारगड, सत्यम शिंदे, आक्रम कुरेशी, स्वप्नील खरात आदी उपस्थित होते.