पंढरपूर - तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेऊन, करकंब येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजीतसिंह शिंदे, रजनी देशमुख, सरपंच तेजमाला पांढरे, माजी सरपंच अदिनाथ देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, नायब तहसीलदार पंडीत कोळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले उपस्थित होते.
करकंबमध्ये 50 बेडचे कोविड केअर सेंटर, प्रशासनाकडून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न
ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित रुग्णांना गावातच वेळत उपचार मिळावेत, यासाठी जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावात कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुढील काही दिवस अधिक धोक्याचे आहेत. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. विना कारण कोणीही घराबाहेर पडू नये, तसेच प्रशासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाकडून साधन सामुग्री उपलब्ध करून देणार
करकंब येथील कोविड केअर सेंटर येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारसाठी उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभा साखरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक तुषार सरवदे व आरोग्य कर्मचारी तसेच गावांतील खाजगी डॉक्टर वैद्यकीय सेवा देणार आहेत. ग्रामपंचायती मार्फत वेळोवेळी स्वच्छता करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक वैद्यकीय साहित्य व इतर गरजेची साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने अधिकचे 50 बेडची उपलब्धता करण्यात येणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले यांनी यावेळी सांगितले.