सोलापूर- ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ड्युटी संपवून दुचाकी वरून घरी जात असताना बार्शी-सोलापूर मार्गावर असलेल्या शेळगाव या गावाजवळ त्यांच्यावर हा हल्ला झाला आहे. रेश्मा सुतार असे जखमी महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यात रेश्मा यांच्या हाताला व पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका पोलिसानेच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती-
रेश्मा सुतार ही महिला पोलीस कर्मचारी वैराग पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांची छेड काढली होती. रेश्मा सुतार हिने त्याबाबत संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. यामुळे तो सहकारी पोलीस कर्मचारी रेश्मावर चिडून होता आणि त्यानेच हा हल्ला केला असल्याची प्राथमिक माहिती महिला पोलीस रेश्मा यांनी दिली आहे.
शेळगावच्या महिला पोलीस शिपायावर तलवार हल्ला; धावत्या दुचाकीला लाथ मारून पाडले आणि तलवारीने केला हल्ला- वैराग पोलीस स्टेशन मधील कामकाज संपवून महिला पोलीस कर्मचारी रेश्मा या बुधवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होत्या. त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग करत धावत्या दुचाकीला मागून लाथ मारली. यामध्ये रेश्मा या खाली पडल्या, त्यानंतर लगेच त्या हल्लेखोरांनी रेश्मा यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि घटनास्थळवरून पळ काढला. या हल्ल्यात रेश्मा यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांनी रुग्णालयात दाखल केले.
सोलापूर ग्रामीण पोलीस दलात खळबळ-
ग्रामीण पोलीस प्रमुख म्हणून महिला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते हे कार्यभार सांभाळत आहेत. त्यातच तीन हल्लेखोरांनी एका महिला पोलीस कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला केला. यामुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात महिला पोलीसच सुरक्षित नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.