पंढरपूर - तालुक्यातील रोपळे येथे दूध संकलन केलेले पैसे चार चौघात का मागतो, म्हणून एकाने दूध डेअरी चालकावर जीवघेणा हल्ला केला. डेअरी चालकाला तोंडात जबरदस्तीने अॅसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. डेअरी चालक विशंभर कदम यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये नितीन रघुनाथ कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दूध गोळा केलेल्या उचल ॲडव्हान्सवरून वाद -
पंढरपूर तालुक्यातील रोपळेत डेअरी चालकावर जीवघेणा हल्ला - Pandharpur Latest News
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथे विशंभर कदम यांची सह्याद्री दूध डेअरी आहे. विशंभर कदम यांनी नातेवाईक असणाऱ्या नितीन कदम याच्याकडे गावातील शेतकऱ्यांचे दूध गोळा करण्याचे काम दिले होते. दूध गोळा करण्याच्या कामासाठी नितीन कदम यांना विशंभर कदम यांनी 65 हजार रुपये उचल ॲडव्हान्स दिली होता. त्यापैकी 21 हजार 500 रुपये कमिशन पोटी वजा करून 43 हजार पाचशे रुपयांची रक्कम नितीन कदम यांच्याकडे थकीत होती. त्यातूनच विशंभर कदम हे वारंवार नितीन कदम यांच्याकडे पैशाची मागणी करत होते. त्यातूनच विशंभर कदम व नितीन कदम यांच्यात वाद निर्माण झाला.
डेअरी चालकास जबरदस्तीने ॲसिड पाजण्याचा प्रयत्न -
विशंभर कदम हे वारंवार व चारचौघांमध्ये नितीन कदम यास ॲडव्हान्सचे पैसे मागत होते. त्यामुळे चिडून नितीन कदम यांनी 'तू नेहमी चार-चौघात मला पैसे मागून माझी बेइज्जती करतो, माझी लोकांमध्ये अब्रू खातो, तुझे कसले पैसे मला माहिती नाही, थांब तुला आता जिवंत ठेवत नाही' असे म्हणत नितीन कदम याने खुर्चीवर बसलेल्या विशंभर कदम याच्या तोंडात जबरदस्तीने ॲसिड पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये विशंभर कदम यांनी दिली.