सोलापूर -आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडे सरकारने थोडे तरी लक्ष द्यावे, अशी मागणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी केली आहे. सरकारच्या असलेल्या योजना विधवा शेतकरी महिलांना मिळाव्यात यासाठी शासकीय कार्यालयाच्या वारंवार चकरा माराव्या लागतात. तरीही काम होत नसल्याने शेतकरी विधवा महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बार्शी तालुक्यातील राजश्री पाटील या विधवा शेतकरी महिला असून त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यांच्या घरकुलाचा अर्ज मान्य होत नाही. गावपातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत अनेकदा चकरा मारून देखील त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. राजश्री पाटील यांच्या शेतकरी पतीने २०१५ मध्ये आत्महत्या केली. त्यांना २ एकर शेती आहे. मात्र, शेती असूनही ती उपयोगाची नसल्याने, पतीच्या निधनानंतर त्या दुसऱ्याच्या शेतावर जाऊन शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून कुटुंब, शाळा यांचा भार त्यांच्या डोक्यावर आहे. त्या सध्या दुसऱ्याच्या घरात राहतात. स्वतःचे घर मिळवण्यासाठी त्यांनी घरकुलासाठी अर्ज केला होता, मात्र त्यांचे घरकुल काही केल्या मंजूर होत नाही आहे.
हेही वाचा -शांतलिंगेश्वर महास्वामींच्या सानिध्यात 4 लमाण तांडे दारूमुक्त