सोलापूर - तुरीच्या पिकात गांजाची शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शेतातून 6 लाख 69 हजार 500 रुपये किमतीचा 133 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. माढा पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
सोलापुरात तुरीच्या शेतात पिकवला गांजा, शेतकऱ्याला अटक
गांजाची शेती करणाऱ्या शेतकऱ्याला माढा पोलिसांनी अटक केली आहे. शेतातून 6 लाख 69 हजार 500 रुपये किमतीचा 133 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. माढा पोलिसांनी छापा टाकल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
माढा तालुक्यातील बावी गावात बंडू औंदुंबर मोर आणि जरीचंद विश्वनाथ मोरे यांची शेती आहे. त्यांनी शेतातील तुरीच्या पिकात विनापरवाना गांजाच्या झाडांची लागवड केली. ही झाडे पाच फूट उंचीपर्यंत वाढली होती. बावी गावात गांजांची शेती होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, माढा पोलिसांनी शेतात छापा टाकला. पोलिसांनी 133 किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. बाजारभावानुसार पाच हजार रुपये प्रतिकिलो दराने याची किंमत 6 लाख 69 हजार 500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. माढा पोलिसांनी बंडू मोरे या शेतकऱ्याला अटक केली आहे.