सोलापूर - मंगळवेढा तालुक्यातील पाच गावातील शेतकऱ्यांना नाबार्डचे लोन मिळवून देतो, अशी थाप मारून एका कंपनीने फसवणूक केली आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. जोपर्यंत संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. मंगळवेढा येथील भाळवणी, डोंगरगाव, तळसंगी, हजापूर, जुणोनी या गावातील शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
दुग्ध व्यवसायापासून फसवणूक सुरू -
लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीने ही फसवणूक केला असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांना पाच-पाच जणांचे गट स्थापन करण्यास सांगितले. दुग्ध व्यवसायसाठी विदर्भ कोकण बँकेकडे अर्ज करण्यास सांगितले. बँकेने गायी घेण्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये व दुसऱ्या हप्त्यात 3 लाख 50 हजार असे एकूण 7 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. परंतु शेतकऱ्यांच्या हाती फक्त 3 लाख 23 हजार रुपये आले.
शेतकऱ्यांकडून कमी दाराने दूध घेतले -
लक्ष्मी कृषी विकास प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांकडून दूध घेण्यास सुरुवात केली. हे दुध इतर कंपन्यापेक्षा 4 ते 5 रुपये प्रती लिटर कमी दराने घेतले. शेतकरी हे सबसिडी मिळेल या आशेने कंपनीविरोधात गप्पच होते. या कंपनीने गावोगावी दूध डेअरी स्थापन करून शेतकऱ्यांकडून अल्प दरात दूध घेतले आहे.