सोलापूर - कांद्यावरील निर्यातबंदी हटवत केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 1 जानेवारीपासून निर्यातबंदी उठवल्याचा निर्णय लागू झाला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना सुखद दिलासा मिळाला होता, परंतु सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी वर्ग नाराज झाला आहे.
हेही वाचा -अधिकारी असल्याची थाप मारुन केले लग्न, एक अटकेत
कांद्याचे भाव वाढण्याऐवजी प्रति क्विंटल कमी होत चालले आहे. बाहेर देशातील व्यापारी ताबडतोब मागणी करत नसल्याने ही घसरण होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
सरकारचे कांदा विषयक धोरण -
दिवाळी अगोदरच्या कालावधीत कांद्याचे आवाक्याबाहेर जाणारे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यातबंदी सोबत व्यापाऱ्यांवर निर्बंध आणले होते. 14 सप्टेंबर रोजी सरकारने कांदा निर्यातबंदी केली होती. तसेच, कांद्याच्या साठवणुकीबाबत व्यापाऱ्यांवर अनेक निर्बंध आणि मर्यादा घातली होती. कांदा निर्यातबंदी आणि मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे दर घसरले होते. अखेर तीन महिन्यांनी कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे.
निर्णयामुळे भाववाढ अपेक्षित, मात्र शेतकऱ्यांचा हिरमोड
निर्यातबंदीचा निर्णय 1 जानेवारीपासून सरकारने मागे घेतला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना आता परदेशात कांदा पाठवण्याची परवानगी मिळाली आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकरी हे भाववाढ मिळेल, अशी अपेक्षा करत सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीत कांदे घेऊन येत आहेत. कांदा 5 हजार रुपये प्रति क्विंटल विकला जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, उत्तम दर्जाच्या कांद्याला फक्त 2 हजार 900 रुपये प्रति क्विंटलपर्यंतच भाव मिळत आहे.